१) आम्ही शांत बसणार नाही.! मुंडेंच्या कमबॅकची शक्यता, सुप्रिया सुळेंचा इशारा : नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावलीये. यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खाती तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवलीयेत. कोकाटेंच्या जागी आता माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यताय. मुंडेंनी नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आलंय. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारला थेट इशारा दिलाय, “जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केलं, तर आम्ही शांत बसणार नाही! बीडमध्ये जाऊन उपोषण करू आणि राज्यभर आंदोलन छेडू!” असं त्यांनी म्हंटलंय. २) ट्रम्प तात्या म्हणतात, टॅरिफ माझा प्रिय शब्द… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ शब्दाने जगाच्या पाठीवरील अनेक देशांना वेठीस धरलंय. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे टॅरिफ केवळ व्यापारापुरता मर्यादित राहिला नसून, ते ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराचं शस्त्र बनलंय. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्याच धोरणाचे गोडवे गायलेत, “टॅरिफमुळे केवळ अमेरिकेची शक्तीच दिसली नाही, तर जागतिक दबाव निर्माण करण्यातही हे धोरण प्रभावी ठरलं. या दबावामुळे अनेकदा दोन देशांमधील युद्ध थांबवता आलं. मुळात टॅरिफ हा माझा आवडता शब्द आहे. केवळ १० महिन्यांमध्ये मी आठ युद्ध संपुष्टात आणली.” असा दावाही त्यांनी केलाय. ३) पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी करा! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आक्रमक : नवी दिल्लीत भाजपने आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर निशाणा साधलाय. भाजप प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी, पृथ्वीराज चव्हाणांवर भारतीय लष्कराच्या पराक्रमाचा अपमान केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या हाकालपट्टीची मागणी केलीये… दि. ७ मे रोजीच्या हवाई संघर्षात अर्थात ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाला, असं विधान चव्हाणांनी केलेलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, या कारवाईवर शंका उपस्थित करून चव्हाण लष्कराचं मनोबल खच्ची करत असल्याचं भाजपने म्हटलंय. हे विधान केवळ राजकीय नसून देशविरोधी असल्याचा शिक्का देखील भाजपने मारलाय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी या विधानाबद्दल देशाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आलीये. ४) मुंडे नव्हे बीडचा ‘हा’ नेता कोकाटेंच्या जागी? अजित पवार घेणार मोठा निर्णय… शासकीय सदनिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय हालचालींना वेग आलाय. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. या शर्यतीत धनंजय मुंडे यांच नाव आघाडीवर असलं तरी या रेसमध्ये विजयसिंह पंडित देखील आहेत… ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू असलेले विजयसिंह पंडित हे पवार कुटुंबाचे अत्यंत विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. धनंजय मुंडे मंत्रिपदाच्या शर्यतीत असले तरी, सुप्रिया सुळे यांनी मुंडेंच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा, विजयसिंह पंडित यांना संधी देण्याचा विचार अजित पवार करतील अशी शक्यताय. ५) देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच! “जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही!” अशी गर्जना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरडीच्या सभेत केलीये… नगरपालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेत. यावेळी त्यांनी शहरी विकासाचा पाढा वाचला. फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या काळात शहरांकडे दुर्लक्ष झालं, पण मोदी सरकारच्या काळात शहरांना विकासाचा नवा केंद्रबिंदू बनवण्यात आलंय. स्मार्ट सिटीपासून ते हर घर जल योजनेपर्यंत, फडणवीसांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. महाराष्ट्रात ३० लाख घरं गरिबांना दिल्याचा दावा त्यांनी केलाय. पाथरडीसाठी २२० कोटींच्या योजनेची भेटही त्यांनी यावेळी जाहीर केली. ६) भारताच्या संरक्षण क्षेत्रात नेदरलँड्सची साथ! राजनाथ सिंह आणि डच परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ऐतिहासिक करार रशिया आणि अमेरिकेनंतर आता युरोपातील महत्त्वाचा देश नेदरलँड्ससोबत भारताने एक मोठा लष्करी करार केलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या नव्या भागीदारीची मुहूर्तमेढ रोवलीये… नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन वील यांची भेट झाली. या भेटीत ‘लेटर ऑफ इंटेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँड्समध्ये राहणारे भारतीय दोन्ही देशांच्या मैत्रीला अधिक घट्ट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यासाठी आणि भारताला संरक्षण उत्पादनाचं हब बनवण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरेल. ७) बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’ अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा भारतीय टीमचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह सध्या चर्चेत आहे, पण त्याच्या विकेट्समुळे नाही, तर त्याच्या संतापामुळे! नेहमी कूल राहणारा बुमराह विमानतळावर चेक-इनसाठी रांगेत उभा होता. एक सामान्य प्रवाशाप्रमाणे तो आपल्या नियमांचे पालन करत होता. पण तिथे एका चाहत्याने अशी काही चूक केली, ज्यामुळे बुमराहचा पारा सातव्या अस्मानावर गेला. चाहत्याने बुमराहची साधी परवानगीही घेतली नाही. त्याने थेट मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन केला आणि बुमराहच्या अगदी जवळ जाऊन रेकॉर्डिंग सुरू केलं. आपल्या प्रायव्हसीमध्ये झालेला हा हस्तक्षेप बुमराहला मुळीच आवडला नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता नवी चर्चा सुरू झालीये. सेलिब्रिटींनाही स्वतःचं खाजगी आयुष्य असतं आणि चाहत्यांनी त्याचा आदर राखायला हवा, असं मत आता व्यक्त केलं जातंय. ८) ‘तीन पोती गहू विकून आलो होतो…’, सामना रद्द झाल्यानंतर संतापलेल्या चाहत्याचा VIDEO व्हायरल : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनौ येथे खेळवला जाणार होता. मात्र, उत्तर भारतात वाढलेल्या प्रचंड धुक्यामुळे सुरक्षेचे कारण देत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मैदानावर मोठ्या आशेने आलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांना एकही चेंडूचा खेळ न पाहता रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. ज्यामुळे चाहते प्रचंड संतापले होते, ज्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका चाहत्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले की, “मी माझे घरचे तीन पोती गहू विकून या सामन्याचे तिकीट खरेदी केले होते, आता मला माझे पैसे परत हवे आहेत.” आग्र्याहून सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या एका चाहत्याने आपला हिरमोड झाल्याचे सांगितले. ९) जमावाकडून धक्काबुक्की, गैरवर्तन…; निधी अग्रवालला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील ‘सहाना सहाना’ या गाण्याचा लाँच सोहळा हैदराबादमध्ये झाला. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला निधी अग्रवालने देखील हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमातून बाहेर पडताना अभिनेत्री निधी अग्रवाल हिला प्रचंड गर्दीने घेरले, ज्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. चाहते तिला पाहण्यासाठी, ऑटोग्राफसाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की करताना दिसले. तिच्या अवतीभवती बॉडीगार्ड असूनही ती गर्दीत पूर्णपणे अकडलेली दिसली. या गोंधळात निधीला धक्काबुक्की झाली आणि तिला अक्षरशः ओढण्यात आले. १०) बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकाचा कोर्टात लढा, एक्स पत्नीवर ठोकला मानहानीचा खटला ! ९० च्या दशकात आपल्या आवाजाने देशाला वेड लावणारे गायक कुमार सानू सध्या एका मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांच्या माजी पत्नीने त्यांच्यावर असे काही आरोप केले आहेत, ज्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य यांचा २००१ मध्ये घटस्फोट झाला. पण तब्बल २४ वर्षांनंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रीता यांचा आरोप आहे की, जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा कुमार सानू त्यांना उपाशी ठेवायचे आणि किचनमध्ये बंद करून ठेवायचे. त्यांना वेळीच औषधंही दिली जात नव्हती. शिवाय सानू यांचे बाहेर अनेक अफेअर्स होते, असा दावाही त्यांनी केला आहे. हे सर्व आरोप फेटाळत कुमार सानू यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पत्नीविरुद्ध ३० लाख रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला असून, त्यांची बदनामी करणाऱ्या सर्व मुलाखती हटवण्याची मागणी केली आहे.