ठाणे : अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली असून, सुमारे १५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शिंदे गटाच्या नेत्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे यांच्यावर थेट EVM छेडछाडीचा आरोप केला आहे. हा प्रकार अंबरनाथमधील साऊथ इंडियन शाळेत उभारलेल्या मतदान केंद्रावर घडल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबंधी पॅनल क्रमांक ५ मधील EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) ने केला. आरोपानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्राबाहेर जमा झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांची शासकीय कर्मचाऱ्यांसोबत जोरदार बाचाबाची झाली. शिंदे गटाचे नेते गोपाळ लांडगे यांनी EVM मशीन तातडीने बदलण्याची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. अंबरनाथ ही शिवसेना (शिंदे गट) चा बालेकिल्ला मानला जातो, तर भाजपसोबत युती असूनही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, शिंदे गटाच्या या आरोपाने मतदान प्रक्रियेवर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी सर्व पक्षांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.