मुंबई : महानगरी मुंबईतील महापौरपदाचा सस्पेन्स आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिंदेसेना या मित्रपक्षांमधील कथित रस्सीखेचीमुळे मुंबईचा महापौर कोण बनणार याविषयी राजकीय पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्या पेचावर दिल्लीत तोडगा काढला जाईल, असे संकेत मिळू लागले आहेत. यावेळी मुंबई जिंकण्याचे मिशन हाती घेऊन भाजप महापालिका निवडणुकीला सामोरा गेला. शिंदेसेनेला साथीला घेण्याची राजकीय चलाखी त्या पक्षाने दाखवली अन् मिशन फत्ते केले. मात्र, भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीला मिळालेले बहुमत काठावरचे आहे. साहजिकच, सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला महापौरपद मिळवण्यासाठी शिंदेसेनेचा पाठिंबा घेणे अनिवार्य बनले आहे. ती बाब हेरून शिंदेसेनेने पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद आपल्याला मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्याचे मानले जात आहे.