Suryakumar Yadav on Cuttack Red Soil Pitch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकच्या ऐतिहासिक बाराबाती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीसाठी ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेमुळे संघ व्यवस्थापनाला आपल्या तयारीला अधिक मजबूत करण्याची चांगली संधी मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत कटकच्या खेळपट्टीबद्दल एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे चाहते आणि तज्ज्ञांची उत्सुकता वाढली आहे. कटकच्या खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवचे मत – सामन्यापूर्वी खेळपट्टीबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, बाराबाती स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची बनलेली आहे, जो त्याच्यासाठी एक नवीन अनुभव आहे. त्याने सांगितले की, त्याला अजून खेळपट्टी अगदी जवळून बघायला मिळाली नाही, पण पहिल्या नजरेत विकेट चांगली वाटत आहे. हेही वाचा – IND vs SA : सलामीवीर कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्याने दिले थेट उत्तर सूर्यकुमार म्हणाला, “सामान्यतः काळी मातीचीखेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. पण मला वाटते की लाल मातीच्या या खेळपट्टीवरही चांगले क्रिकेट खेळायला मिळू शकतो. जर खेळपट्टी वेगवान राहिली, तर ती आमच्या संघासाठी फायदेशीर ठरू शकते. आता सामन्याच्या दिवशी ही खेळपट्टी कशी वागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.” बाराबाती स्टेडियममधील टी-२० आकडेवारी – कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये आतापर्यंत जास्त उच्च धावसंख्येचे टी-२० सामने झालेले नाहीत. या मैदानावर एकूण तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघाला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पिचवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी ठरतात. संध्याकाळच्या वेळी दव पडत असल्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होते, त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. हेही वाचा – Suryakumar Yadav : दोन दिवस आधी नव्हे, ‘या’ वेळेपासून वर्ल्ड कपची तयारी सुरू! सूर्याने सांगितला टीम इंडियाच्या यशाचा फॉर्म्युला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व एकंदरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ३१ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १२ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १४ वेळा, तर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना ९ वेळा विजय मिळवला आहे.