AIMIM : एकीकडे राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत झालेला विजय तर दुसरीकडे एमआयएम पक्षाने दाखवलेला करिष्मा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसींच्या नेतृत्वाखालील एमआयएम पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. २९ पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आलेले आहेत. निवडणुकीत मिळालेल्या या घवघवीत यशानंतर एमआयएम पक्षाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे कूच केली असून, तयारीला सुरुवात केली आहे. नुकताच या निवडणुकांसदर्भात पक्षाच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयएम पक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा मोठा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. राज्यातील सोलापूर, धुळे आणि नांदेडमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८, १० आणि १५ असे एकूण ३३ उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईत देखील एमआयएमने चांगली कामगिरी करत ८ जागा जिंकल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ३३ नगरसेवक एमआयएम पक्षाचे विजयी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात स्वबळ या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी सोलापुर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी 20-25 जागा लढण्याची तयारी एमआयएमने केली असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. हेही वाचा : चांदीचा विक्रम ! अचानक १३००० रुपयांनी महागली ; चांदी पहिल्यांदाच ३ लाखांच्या पार तर सोन्याचा आजचा भाव वाचाच