Sourav Ganguly 50 crore defamation suit : फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेला गोंधळ आता कायदेशीर वादात अडकला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. कोलकाता येथील लालबाजार येथील गुन्हे शाखेत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? लिओनेल मेस्सी १३ डिसेंबर रोजी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी कोलकात्यात पोहोचला होता. सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, काही कारणास्तव मेस्सी नियोजित वेळेपूर्वीच स्टेडियममधून बाहेर पडला. यामुळे उपस्थित चाहत्यांचा हिरमोड झाला आणि स्टेडियममध्ये मोठा गोंधळ व अफरातफरी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला सौरव गांगुली देखील एक पाहुणे म्हणून उपस्थित होते. बदनामीचा आरोप – या घटनेनंतर अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांनी सौरव गांगुली यांच्यावर अनेक वादग्रस्त आणि खोटे आरोप केले होते. गांगुली यांच्या दाव्यानुसार, साहा यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. “मी त्या कार्यक्रमात केवळ एक पाहुणा म्हणून उपस्थित होतो, आयोजनाशी माझा कोणताही थेट संबंध नव्हता. तरीही माझ्यावर खोटे आरोप करून माझी सार्वजनिक प्रतिष्ठा मलीन करण्यात आली,” असे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा – SMAT 2025 Title : झारखंडने रचला इतिहास! इशानच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर कोरलं नाव कायदेशीर कारवाई – आपल्या वैयक्तिक सन्मानाला ठेच पोहोचल्यामुळे गांगुली यांनी उत्तम साहा यांना कायदेशीर नोटीस बजावली असून ५० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली असून, आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.