पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला आहे. पण या सगळ्यात काँग्रेसने देखील विजयाचे खाते उघडले आणि माजी महापौर राहिलेले प्रशांत जगताप विजयी झाले. प्रभाग क्रमांक १८ ड मधून ते निवडणुकीच्या रिंगाणात उभे होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रभागातून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभवाची धुळ चारली. एकीकडे जगताप यांनी विजयाचा गुलाल उधळला, दुसरीकडे मात्र त्यांची आई रत्नप्रभा जगताप यांच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे एकीकडे मुलगा विजयी झाला. मात्र आईच्या वाट्याला पराभव आला असे चित्र पुणे पालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे. खरंतर महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीला सुरुवातीपासून प्रशांत जगताप यांनी कडाकडून विरोध दर्शवला होता. अगदी शेवटच्या क्षणी ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक १८ ड मधून ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या विजयाने मरगळलेल्या काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत प्रशांत जगताप यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अभिजित शिवरकर यांचा १८०० मतांनी दारूण पराभव केला आहे. या निवडणुकीच्या निकालाची पुण्यात जोरदार चर्चा होत आहे.