Sanjay Raut : सकाळी १० वाजता मुंबई महापालिकासाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, मुंबईत पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर ठाकरे बंधूंच्या युती दुसऱ्या स्थानावर आहे. निकालाचे चित्र दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याकडे लक्ष लागलेले आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले आहे. लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काल झालेल्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मोठा गोंधळा झाल्याचे पाहायला मिळाले. तर अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे आरोप करण्यात आले. या सगळ्यात तुतारीचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत जाणं, मशालीचं बटण दाबलं न जाणं हे देखील काही मतदान केंद्रांवर घडले असल्याचा आरोप होत आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना शिंदे यांची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. एक्सिट पोलवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “एक्झिट पोल नाहीतर आणखी काही येऊ द्या, लोकांनी मतदान केलं आहे. जे घोटाळे करायचे ते केले आहेत. पैशांचं वाटप नक्की झालं आहे. शाई पुसली गेली आहे. तरी आम्ही खात्रीने सांगतो की निकाल लागू देत. मुंबईकर, मराठी माणसाने शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला मतदान केलं आहे” संजय राऊत यांचा आरोप संजय राऊत यांनी काल एक्सवर ट्वीट करत मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत भाजपची बैठक झाल्याचे म्हटले होते. काल 6 वाजता भाजपाचे काही प्रमुख लोक आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ बैठक झाली, असा आरोप राऊत यांनी आहे. तसेच कशासाठी राजकीय पक्षांसोबत बैठका घेत आहात? काय अजेंडा ठरला आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांनी लोकांनी मोठ्या संख्येने आम्हला मतदान केलं आहे. यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे म्हणून तर खात्रीने 140 जिंकू वैगेरे सांगत आहेत, असा टोला भाजप शिंदेंना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही बहुमत मिळेल असं सौम्यपणे सांगत आहोत. जे मुंबई वाचवण्यासाठी, भाजपला रोखण्यासाठी येतील त्यांची मदत घेतली जाईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात; पुण्यात भाजपची आघाडी