Weather Alert : राज्यात सध्या तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून हवामानाचा लहरीपणा कायम आहे. काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असताना, सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच मिश्र हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 जानेवारीला कसं असेल हवामान? कोकण व मुंबई कोकण विभागासह मुंबईत हवामान मुख्यतः निरभ्र राहणार आहे. ढगांचा प्रभाव कमी राहील. दुपारच्या वेळेत उकाडा जाणवण्याची शक्यता असून मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल. पश्चिम महाराष्ट्र पहाटे थंडीचा प्रभाव जाणवेल, मात्र दिवसभर तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात सकाळी हलकं धुकं पडू शकतं. आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी गारवा आणि दुपारी उकाडा असा अनुभव येईल. मराठवाडा सकाळी थंड वातावरण राहील, त्यानंतर दुपारच्या वेळेत उष्णता जाणवेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान निरभ्र राहणार असून कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे मागील काही दिवसांत रात्रीचा गारवा कमी झाल्याचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्र पहाटे गारवा आणि दिवसभर स्वच्छ आकाश असा हवामानाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहील. काही भागांत सकाळी हलकं धुकं पडू शकतं. विदर्भ काही जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. नागपूरमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान थेट 8 अंशांपर्यंत घसरले आहे.