Sunil Gavaskar on Shubman Gill : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने शनिवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र, भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील नियमित खेळाडू आणि उपकर्णधार शुबमन गिलला संघातून डच्चू देण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. अशात सुनील गावस्करांनी गिलला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. खराब फॉर्म आणि दुखापतींचा फटका – शुबमन गिल गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकेत त्याने ४, ० आणि २८ अशा निराशाजनक धावा केल्या, तर दुखापतीमुळे तो पाचवा सामना खेळू शकला नाही. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “गिल हा नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु सध्या त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. संघाच्या संयोजनाचा विचार करता १५ खेळाडूंमध्ये प्रत्येकाला स्थान देणे कठीण असते, त्यामुळे दुर्दैवाने गिलला बाहेर राहावे लागले.” गावस्करांचा ‘नजर’ उतरवण्याचा सल्ला शुबमन गिलच्या निवडीवर भाष्य करताना महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘जिओ स्टार’च्या एका शोमध्ये बोलताना गावस्कर म्हणाले, “गिल हा एक क्लास खेळाडू आहे. फॉर्म येतो आणि जातो, पण प्रतिभा कायम राहते. त्याची निवड न होणे हे धक्कादायक आहे.” हेही वाचा – Team India : टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंची घोषणा का नाही? BCCIच्या सचिवांनी सांगितलं कारण यावेळी गावस्कर यांनी गिलला एक खास वैयक्तिक सल्लाही दिला. ते म्हणाले, “मी शुबमनला सांगितले की, तुला ज्या प्रकारे दुखापती होत आहेत त्या खूप विचित्र आहेत. आधी मान आणि आता गुडघ्याची दुखापत. मी त्याला प्रेमाने सल्ला दिला आहे की, त्याने घरी कोणालातरी सांगून आपली ‘नजर’ उतरवून घ्यावी. आपण भारतीय लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि कधीकधी खरोखरच नजर लागते.” हेही वाचा – Hardik Pandya : अर्धशतकानंतर फ्लाइंग किस ते विजयानंतर कार राइड….हार्दिक-माहिकाचा रोमँटिक VIDEO व्हायरल रिझर्व्ह खेळाडूंचा पेच – या विश्वचषकासाठी अद्याप कोणत्याही राखीव खेळाडूंची घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, स्पर्धा भारतातच असल्याने गरज पडल्यास कोणत्याही खेळाडूला तातडीने संघात सामील करून घेता येईल, त्यामुळे स्वतंत्र रिझर्व्ह खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. शुबमन गिलसारख्या बड्या खेळाडूला संघातून वगळल्याने आता सलामीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल आणि गिल पुनरागमन कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.