Mustafizur Rahman Release Shivsena UBT Welcome BCCI : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी केकेआरने बीसीसीआयच्या सूचनेनंतर बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला रिलीज केले. यानंतर बीसीसीआयच्या या निर्णयाने आता राजकीय वळण घेतले आहे. या निर्णयावर शिवसेना (यूबीटी) प्रवक्ते आनंद दुबे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी बीसीसीआयने उचलल्या पावलाचे स्वागत केले आहे. “उशिरा घेतला, पण योग्य निर्णय” – बीसीसीआयच्या सूचनेनंतर मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून बाहेर केल्याच्या वृत्तावर बोलताना आनंद दुबे म्हणाले की, “हा निर्णय घेण्यास थोडा उशीर झाला असला, तरी तो योग्य आहे. शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात खेळू नये. हा केवळ राजकारणाचा भाग नसून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि देशाच्या भावनेशी संबंधित विषय आहे.” शमी-सिराजचा उल्लेख करत केकेआरवर निशाणा – आनंद दुबे यांनी भारतीय गोलंदाजांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत परदेशी खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “जेव्हा आपल्याकडे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि सर्फराझ खान यांच्यासारखे दिग्गज आणि धुरंधर खेळाडू आहेत, तेव्हा आपल्याला मुस्तफिजुर रहमानची गरजच काय? भारतीय क्रिकेट आज आत्मनिर्भर आहे. अशा परिस्थितीत परदेशी, विशेषतः बांगलादेशी खेळाडूंवर अवलंबून राहणे हे देशाच्या भावनेच्या विरोधात आहे.” हेही वाचा – Mustafizur Rahman Release : मोठी बातमी! BCCI च्या आदेशानंतर मुस्तफिजुर रहमानला KKR मधून डच्चू बीसीसीआय सचिवांचे मानले आभार – बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल दुबे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पुढे मागणी केली की, केवळ आयपीएलच नव्हे तर भविष्यातही बांगलादेशी आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे. भारताने या देशांसोबत कोणत्याही प्रकारचे क्रीडा संबंध ठेवू नयेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. हेही वाचा – Shiv Sena UBT : ‘मुस्तफिजूरची KKR मधून हकालपट्टी करा, अन्यथा IPL…’, शिवसेनेचा (ठाकरे) शाहरुखसह BCCIला इशारा दोन्ही देशांमधील संबंध बिघडले – गेल्या वर्षीपासून भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी त्यांच्या द्विपक्षीय मर्यादित षटकांच्या मालिका पुढे ढकलल्या. राजकीय अस्थिरता, वाढती भारतविरोधी भावना आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दलच्या चिंता यांचा क्रिकेट संबंधांवर परिणाम झाला आहे. या हालचालीमुळे राजनैतिक आणि राजकीय परिस्थितीचा खेळांवर होणारा परिणाम अधोरेखित होतो. त्यामुळे बीसीसीआय अशा बाबींवर संवेदनशील निर्णय घेत आहे.