बुलढाणा : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान (२ डिसेंबर) बुलढाणा नगरपरिषदेच्या मतदानाला सुरुवात होताच बोगस मतदानाच्या आरोपांनी खळबळ उडाली. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसांच्या ताब्यातील एका बोगस मतदाराला पळवण्यास मदत केल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस पक्षाच्या तक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली. काय आहे प्रकरण? मतदानाला सकाळी ७:३० वाजता सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांत, वार्ड क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक विद्यालय मतदान केंद्रावर एक संशयित बोगस मतदार पकडला गेला. हा व्यक्ती कोथळी येथील वैभव देशमुख यांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांना सोपवले. मात्र, तात्काळ संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. येथे कुणाल यांनी पोलिसांना शिवीगाळ केली आणि बोगस मतदाराला पळवण्यास मदत केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटले, “बुलढाण्यात बोगस मतदान होत आहे. वाहनांमध्ये लोक आणून मत चोरी होतेय. मत चोर, सत्ता सोडा.” त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याशिवाय, दोन वाहनांमध्ये बोगस मतदार आणल्याचा आणि ग्रामीण भागातून लोक आणून मतदान करवून घेतल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी सांगितले, “शासकीय तंत्रनिकेतन येथे बोगस मतदार पळून जात असताना काही लोकांनी पकडले. पोलिसांना पडताळणीसाठी जाण्यापूर्वीच दोघांनी अडथळा आणला, याची तक्रार मिळाल्याने गुन्हा दाखल केला.” या घटनेबरोबरच, जिजामाता नगरातील गांधी विद्यालयात तीन बोगस मतदार पकडले गेले असून, त्यांच्यावरही बोगस मतदानाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून, व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली जाईल.