ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे शहराच्या महापालिकेतील सत्ता पुन्हा शिंदेसेनेने राखली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेसेनेच्या ठाण्यातील वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. ठाण्यातीलच कल्याण डोंबिवली (केडीएमसी) महानगरपालिकेत मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजपने प्रथमच या महापालिकेत शिंदेसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. मात्र, दोन्ही तुल्यबळ योद्द्ध्यांच्या लढतीमध्ये विरोधक भूईसपाट झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेत ठाकरेसेना, मनसे व शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली होती. तर दुसऱ्या बाजूला शिंदेसेना, भाजप व रिपाई यांनी युती करताना निवडणूकीला सामोरे गेले. एकूण ३३ प्रभाग असलेल्या ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेनेच्या प्रभाग 19 मधील चारही नगरसेवकांनी विजयाने सुरुवात केली. यानंतर प्रभाग क्रमांक 4- ड मध्ये शिंदेसेनेच्या सिद्धार्थ पांडेने विजयी पताका फडकवल्यानंतर टेंभी नाक्यावर आनंद आश्रमाजवळ कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिंदेसेनेने शेवटचे कल हाती आले तोपर्यंत 40 तर भाजपने 24 जागांवर विजय साकारला होता. 131 नगरसेवक असलेल्या ठाणे महानगर पालिकेत बहुमतसाठी आवश्यक असलेला आकडा महायुतीने सहज गाठला असून विरोधकांना दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देखील महायुतीने आपला झेंडा रोवला आहे. 122 जागा असलेल्या महानगरपालिकेत शिंदेसेना व भाजपने केवळ नावाला विरोधक शिल्लक ठेवले आहेत. या महापालिकेवर गेल्या काही वर्षांपासून शिंदेसेनेचे वर्चस्व होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याच लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे शिंदेसेनेचे वर्चस्व राखणे स्वाभाविक होते. भाजपने डोंबिवलीचे आमदार असलेल्या रवींद्र चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपविले. त्यानंतर या भागामध्ये भाजपने देखील आपली ताकद पणाला लावली. मात्र उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली असली तरी देखील युती शाबूत राहिल्याने विरोधात असलेल्या ठाकरेसेना, मनसे, कॉंग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांच्या हाती काहीही लागले नाही. ठाणे महानगर पालिकेसारखेच या महापालिकेत देखील विरोधकांना दोन आकडी संख्या गाठता आली नाही.