मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी सस्पेन्स वाढवला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमधील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते. केडीएमसीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करण्याची शक्यता असून, मुंबईसह एमएमआर परिसरातील इतर महापालिकांबाबतही चर्चा झाली. कल्याण-डोंबिवलीत भाजपला 51 तर शिवसेनेला 52 जागा मिळाल्याने महायुतीची सत्ता निश्चित मानली जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील महापौरपदावर शिंदे गटाचा दावा असल्याची चर्चा असून, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात होणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, मंत्री उदय सामंत यांनी महायुतीचाच महापौर होणार असल्याचे संकेत देत नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याबाबत होत असलेल्या आरोपांना नकार दिला आहे.