Shashi Tharoor slam BCCI about Mustafizur Rahman : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे पडसाद आता भारतीय क्रिकेटच्या मैदानावर उमटू लागले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ९.२० कोटींना खरेदी केलेल्या बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयच्या आदेशानंतर संघातून रिलीज करण्यात आले आहे. या निर्णयावरून आता राजकीय युद्ध पेटले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी बीसीसीआयवर सडकून टीका केली आहे. खेळाचे ‘अविचारी’ राजकारण: शशी थरूर यांचा संताप – शशी थरूर यांनी सोशल मीडियावर (X) एक व्हिडीओ पोस्ट करत बीसीसीआयच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. थरूर म्हणाले, “देशातील राजकीय परिस्थितीमुळे किंवा एखाद्या देशाच्या कृत्यामुळे त्या देशाच्या खेळाडूला शिक्षा देणे अत्यंत निंदनीय आहे. जर हा खेळाडू वेगळ्या धर्माचा असता, तर बीसीसीआयने असेच वागले असते का?” त्यांनी पुढे असाही प्रश्न उपस्थित केला की, “मुस्तफिजुरच्या जागी जर लिटन दास किंवा सौम्या सरकार असते तर काय झाले असते? आपण इथे नक्की कुणाला शिक्षा देत आहोत? एका राष्ट्राला, एका व्यक्तीला की एका विशिष्ट धर्माला? खेळाचे हे अविचारी राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाईल?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हेही वाचा – Mustafizur Rahman : भारत-बांगलादेश क्रिकेट संबंध धोक्यात! मुस्तफिजुर प्रकरणावरून वाद पेटला; नेमकं प्रकरण काय? शाहरुख खानवर होता दबाव – बांगलादेशातील हिंसाचारानंतर केकेआरचा मालक शाहरुख खान यालाही सोशल मीडियावरून लक्ष्य करण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांनी बांगलादेशी खेळाडूला संघात घेण्यावरून तीव्र संताप व्यक्त केला होता. विरोधाचा हा वाढता सूर पाहून अखेर बीसीसीआयने हस्तक्षेप केला आणि केकेआरला मुस्तफिजुरला संघातून बाहेर करण्याचे निर्देश दिले. कशी होती मुस्तफिजुरची आयपीएलवारी? लिलावातील किंमत: २ कोटींच्या बेस प्राईस असलेल्या मुस्तफिजुरला केकेआरने ९.२० कोटी रुपयांत विकत घेतले होते. एकमेव खेळाडू: यंदाच्या मिनी लिलावात ७ बांगलादेशी खेळाडू होते, मात्र बोली लागलेला मुस्तफिजुर हा एकमेव खेळाडू होता. रिलीजचे आदेश: शनिवारी बीसीसीआयने त्याला संघातून काढण्याचे आदेश दिले आणि केकेआरला बदली खेळाडू निवडण्याची सवलत दिली. हेही वाचा – Mustafizur Rahman : ‘आपल्याकडे शमी-सिराज असताना रहमानची गरज काय?’ मुस्तफिजूरच्या वादावर आनंद दुबेंची प्रतिक्रिया बांगलादेशातील अस्थिरता आणि भारतीय जनमत – बांगलादेशात सत्तांतरानंतर सुरू झालेल्या अराजकतेत चार हिंदू पुरुषांची जमावाने मारहाण करून हत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे भारतात जनभावना संतप्त होत्या. यापूर्वी शकीब अल हसन, मश्रफी मुर्तझा यांसारखे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत, मात्र सद्यस्थितीत मुस्तफिजुर हा या विरोधाचा बळी ठरला आहे.