मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे नायक सदानंद वसंत दाते यांनी शनिवारी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. अलीकडेपर्यंत ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख होते, परंतु राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले. १९९० च्या बॅचचे अधिकारी असलेले दाते यांची ३१ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी निवृत्त झालेल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून राज्य पोलीस मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी शहरात अनेक ठिकाणी हल्ला केला तेव्हा, मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य विभाग) म्हणून कार्यरत होते. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पहिले पोलीस आयुक्त आणि मुंबईत सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि गुन्हे शाखेतही काम केले आहे. दाते यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये (सीबीआय) डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) आयजी (ऑपरेशन्स) म्हणूनही काम केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्हेगारीमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान दाते यांनी पदभार स्वीकारला आहे.