Shivraj Patil Passes Away : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. आज पहाटे अल्पशा आजाराने त्यांनी ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभा खासदार शरद पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पोस्ट लिहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच इतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी “श्री शिवराज पाटीलजी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती.” राज्यसभा खासदार शरद पवार ठदेशाचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. काँग्रेसची विचारसरणी आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा ध्यास यांचा प्रभावी संगम साधत त्यांनी राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावली. विविध राजकीय पदांवर कार्यरत असताना त्यांनी केलेले कार्य हे निश्चितच जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे ठरले. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खासदार राहुल गांधी “माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटीलजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे आणि पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सार्वजनिक सेवेप्रती त्यांचे समर्पण आणि राष्ट्रासाठी त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पाटील कुटुंब, त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांच्यासोबत संवेदना व्यक्त करतो.” कोण होते शिवराज पाटील चाकूरकर ? भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. शिवराज पाटील चाकूरकर यांचा १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्म झाला. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. हेही वाचा : गोव्यानंतर आता भुवनेश्वरच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग ; सर्वदूर पसरले आगीचे लोट