सासवड : सासवड नगरपरिषदेचा सध्याचा कारभार गचाळपणा, गलथानपणा आणि प्रशासनिक उदासीनतेचे उत्तम उदाहरण आहे. रडकुंडीला आलेला मतदार आणि वेठीस धरलेली जनता याचा दुहेरी संगम म्हणजे सत्ताधाऱ्यांचा कारभार आहे. या सत्ताधारी गटाला ना खेद, ना खंत; वर्षानुवर्षे मूलभूत प्रश्नांभोवतीच सासवड अडकून पडले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत जगताप यांनी केली. यावेळी जगताप यांनी नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाला खडसावले. जगताप यांनी सध्याच्या नगरपरिषदेवर “महत्वाच्या पदांवर रबर स्टॅम्प बसवले गेले असून प्रशासन चालते की चालवले जाते, याची शंका नागरिकांना वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे” अशी टीकाही केली. सासवडसाठी स्वयंभू, स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसामान्यांच्या मनातील नगराध्यक्ष हवाच, असे त्यांनी यावेळी मतदारांना आवाहन केले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज या मूलभूत गरजांसह वाढत्या शहरीकरणाचा ताण नियोजनबद्धरीत्या हाताळणे आजची प्राथमिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विविध नागरी वस्त्यांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध व्यवसायांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अशा गुन्हेगारीकरणाला पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने कठोर कारवाई करून आळा घालण्याची गरज असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सुविधा देणार व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलताना जगताप म्हणाले की, व्यापारी वर्गाला तात्काळ न्याय मिळेल, करोना काळानंतर पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले. आज संपूर्ण बाजारपेठेला प्रदक्षिणा घातली तरी शौचालय किंवा योग्य पार्किंग सुविधा सापडत नाही. सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली जातील. वाहतूक व्यवस्थापन सुधारले जाईल,” असे जगताप यांनी आश्वासन दिले. सरकारी व्यापारी गाळ्यांच्या लिलावामुळे व्यापाऱ्यांवर कायम टांगती तलवार असते; त्यांच्या नियमितीकरणाबाबत जबाबदार निर्णय घेण्यात येतील. जुन्या भाजीमंडईतील प्रश्न रहिवाशी आणि गाळेधारक यांच्याशी समन्वय साधून प्रामुख्याने सोडवले जातील, बाजारपेठ मुख्य रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण आणि सासवडच्या नाव लौकिकात भर घालणाऱ्या बाजारपेठेचे गतवैभव परत मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करू, अशी ग्वाही श्री अभिजित जगताप यांनी दिली.