Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनेक खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक संदीप देशपांडे यांच्याविषयी मोठा दावा केला होता. संदीप देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेत घेतलं नाही. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठीही दिसले नाही पाहिजे, असं वांद्रेच्या बंगल्यावरुन सांगण्यात आलं होतं, असा दावा संतोष धुरी यांनी केला होता. या दाव्यावर आता संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले होते संतोष धुरी? संतोष धुरी भाजपात गेल्यानंतर त्यांनी संदीप देशपांडे नाराज आहे, अशी मनसेच्याच पक्षातील नेत्यांनी चर्चा सुरू केली आहे. म्हणजे संदीप देशपांडेंनी सुद्धा पक्षातून जावं, अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुरु आहे. संदीप देशपांडे जावा यासाठी ते चर्चा घडवून आणत आहेत, असा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. संदीप देशपांडे काय म्हणाले? गेल्या अनेक दिवसांपासून मी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं आहे. मी मनसेतच असून पक्षाचं प्रामाणिक काम करतोय, अशी प्रतिक्रिया सुरू असलेल्या चर्चांवर संदीप देशपांडे यांनी दिल्याने आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडणून येतील, त्यासाठी मी पूर्णपणे काम करतोय, असे देखील संदीप देशपांडे यांनी सांगितले. संतोष धुरी यांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, संतोष धुरी काय बोलतोय, यावर मला रिअॅक्ट होण्याची गरज नाही. संतोष धुरींचा एक दृष्टीकोन असून शकतो. माझाही वेगळा दृष्टीकोन आहे. तो त्याच्या दृष्टीकोनातून बोलतो, मी माझ्या दृष्टीकोनातून बोलतो. असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा : 20 वर्ष एकत्र येण्यासाठी का लागली? ‘सामना’च्या मुलाखतीत राज ठाकरेंनी सगळचं स्पष्ट केलं; उद्धव ठाकरे म्हणाले…