Santosh Bangar – आपल्या आक्रमक शैलीमुळे आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा एका मोठ्या पैजेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कळमनुरी मतदारसंघात तब्बल ७१ लाख रुपयांची पैज लावत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नेमकी पैज काय? कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी येथे यात्रेनिमित्त कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना संतोष बांगर यांनी शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संजय भुरके यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केली. इतकेच नाही तर, भुरके हे निवडणूक जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी ७१ लाखांची पैज लावली आहे. पुढील पाऊल टाकत बांगर यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले की, “संजय भुरके यांना पराभूत करून दाखवा आणि माझ्याकडून ७१ लाखांचे इनाम घेऊन जा.” भर मैदानात त्यांनी दिलेले हे ‘ओपन चॅलेंज’ आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना आहे, तर काही ठिकाणी ठाकरे सेना आणि मनसे युतीशी महायुतीची लढत आहे. या रणधुमाळीत संतोष बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या जागेवरून लावलेली ही पैज राजकीय चर्चांना उधाण देणारी ठरली आहे.