Uddhav Thackeray – ‘संचार साथी’ हे ॲप पेगासस स्पायवेअरचे आणखी एक स्वरुप आहे. याचा वापर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हे लोकांवर हेरगिरी करण्यासाठी करत आहे. लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी सरकारने या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम हल्ला होवून 26 जण मृत्युमुखी पडले होते, त्यावेळी दहशतवादी भारतात कसे घुसले यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दूरसंचार मंत्रालयाने 28 नोव्हेंबर रोजी सर्व मोबाइल उत्पादकांना भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व हँडसेटमध्ये संचारसाथी हे ॲप प्री-इंस्टॉल करण्याचे आदेश दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. संभाव्य हेरगिरीसाठी व वापरकर्त्यांनी देवानघेवाण केलेले संदेश वाचण्यासाठी याचा वापर केला जावू शकतो, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तुम्ही पेगाससबद्दल ऐकलेच असेल. ते फोनमध्ये मालवेअर बसवते व हेरगिरीला सुरुवात करते. त्यांनी पेगाससचे नाव बदलून संचारसाथी असे ठेवले आहे. ते त्यातून हेरगिरी करणार आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच तुमच्यावर आता अविश्वास दाखवत आहेत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.