russia ukraine war : युक्रेनमधील युद्धबंदीबाबत चर्चा करण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये आज पुन्हा फ्लोरिडामध्ये चर्चा होते आहे. रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आपल्या प्रस्तावाचा अजूनही पाठपुरावा केला जातो आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या प्रतिनिधींनी युक्रेन आणि युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेतून काही ठोस तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती. फ्लोरिडामध्ये आज होत असलेल्या चर्चेमध्ये किरील दिमित्रेव हे अध्यक्ष पुतीन यांचे विशेष दूत म्हणून सहभागी झाले आहेत. तर अमेरिकेकडून ट्रम्प यांचे विशेष दूत म्हणून स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे चर्चा करतील. याशिवाय ट्रम्प प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि रशियाच्या शिष्टमंडळामध्ये यापुर्वीची चर्चा मियामीमधील विटकॉफ यांच्या हलांदेल बीच येथील येथील गोल्फ क्लबवर झाली होती. शांतता प्रस्तावाबाबत युक्रेन, अमेरिका आणि युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा सकारात्मक होती. युद्ध थांबवण्याचा पर्याय म्हणून युक्रेनला सुरक्षेची हमी देण्याबाबत तिन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये एकमत झाले होते. अद्याप युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये थेट चर्चा झालेली नाही. अशी थेट चर्चा होण्याची शक्यता रशियाच्या प्रतिनिधींनी फेटाळून लावली आहे. या संदर्भात अमेरिकेने कोणतीही टिप्पणी करणे टाळले आहे. चर्चेमध्ये प्रगती झाली असली, तरी अजून बराच मोठा पल्ला पार करायचा आहे, असे रुबिओ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. युक्रेनला व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे. रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले सुरूच चर्चा सुरू असतानाही रशियाने युक्रेनच्या ओडेसा प्रांतात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान ८ जण ठार झाले आहेत आणि २७ जण जखमी झाले आहेत. चालत्या बसवर क्षेपणास्त्र पडले. एका ट्रकने देखील पेट घेतला आणि पार्किंग केलेली काही वाहनेही या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. युक्रेनच्या लष्करी वाहनांना लक्षय करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे रशियाच्या सशस्त्र दलांनी म्हटले आहे. दरम्यान युक्रेननेही ओखोत्निक आणि अन् ठिकाणच्या लष्करी गस्त पथकांवर आणि तेलाच्या सुविधा केंद्रांवर ड्रोन हल्ले केले.