नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प. पु. डॉ. मोहन भागवत यांनी मतदानाचे कर्तव्य बजावले. महाल येथील नागपूर नाईट हायस्कुल येथील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले. त्यांच्यासमवेत माजी सरकार्यवाह व कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी हेदेखील होते. सर्वात अगोदर दोघेही मतदानासाठी पोहोचले. लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदान महत्त्वाची बाब आहे. ते सर्व नागरिकांचे कर्तव्यही आहे. आपल्याला जो योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे हे महत्त्वाचे आहे. जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॅा. मोहन भागवत यांनी मतदान केल्यानंतर दिली. मतदान करण्याबद्दल निवडणूक आयोग ही सांगत असते, आम्ही ही सांगत असतो, याचा परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल. नोटा म्हणजे सर्वांना आपण रिजेक्ट करतो. मात्र प्रत्यक्षात अव्हेलेबल मधून बेस्ट निवडले पाहिजे. अराजक म्हणजे राजा नसणे ही स्थिती आणि ती सर्वात वाईट असते. महाभारतातदेखील हे सांगितले आहे. त्यामुळे अव्हेलेबल मधून बेस्ट निवडले पाहिजे. जेव्हा आपण नोटाचा वापर करतो तेव्हा आपण नको असलेल्यांनाच मदत करत असतो, असे डॉ. भागवत म्हणाले.