Rohit Sharma statement on Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करिअरमध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक मैदानाबाहेर बसून पाहणे हा अनुभव आपल्यासाठी खूप वेगळा असेल, असे रोहितने बुधवारी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यासह त्याने सिराज, युझी आणि श्रेयसबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘तो’ अनुभव नक्कीच वेगळा असेल – रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ते आता केवळ ५० षटकांच्या (ODI) फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतात. आगामी टी-२० विश्वचषकात भारत ७ फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यावर बोलताना ३८ वर्षीय रोहित म्हणाला, “मी घरी याबद्दल चर्चा करत होतो की टी-२० वर्ल्ड कप घरून पाहणे खूप वेगळे वाटेल. जेव्हापासून ही टूर्नामेंट सुरू झाली आहे, तेव्हापासून मी प्रत्येक विश्वचषकाचा भाग होतो. एखाद्या मोठ्या स्पर्धेत आपण खेळत नाही, हे जेव्हा जाणवते तेव्हा त्याची कमतरता नक्कीच जाणवते. मी स्टेडियममध्ये कुठे ना कुठे उपस्थित असेल, पण हा अनुभव पूर्वीसारखा नसेल.” श्रेयस अय्यरच्या निवडीचा ‘तो’ कठीण निर्णय – आपल्या कप्तानीच्या काळातील कठीण निर्णयांवर भाष्य करताना रोहितने श्रेयस अय्यरचे उदाहरण दिले. २०२२ चा आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकातून श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्यात आले होते. यावर रोहित म्हणाला, “त्यावेळी आम्हाला असा खेळाडू हवा होता जो गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकेल. म्हणूनच आम्ही दीपक हुड्डाची निवड केली, जो तेव्हा फॉर्मात होता. श्रेयसला नक्कीच वाईट वाटले असेल आणि दीपक आनंदी असेल, पण हीच निवडीची प्रक्रिया असते.” रोहितने पुढे सांगितले की, त्याने आणि तत्कालीन मुख्य कोच राहुल द्रविड यांनी वैयक्तिकरित्या श्रेयसशी बोलून त्याला या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले होते. हेही वाचा – Suryakumar Yadav : नागपुरात सूर्याने झळकावलं ‘स्पेशल शतक’! भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू ड्रेसिंग रूममधील मैत्रीपूर्ण वातावरण – रोहितने सांगितले की, त्याने आणि व्यवस्थापनाने मोहम्मद सिराज (चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी निवड न होणे) आणि युझवेंद्र चहल (२०२३ वनडे वर्ल्ड कप) यांच्याशीही अशाच प्रकारे चर्चा केली होती. “संघातील १५ खेळाडूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. जर तुमच्याकडे ठोस कारण असेल आणि तुम्ही ते खेळाडूला नीट समजावून सांगितले, तर गोष्टी सोप्या होतात,” असे रोहितने स्पष्ट केले. आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाला शुभेच्छा – सध्याच्या भारतीय संघावर विश्वास व्यक्त करताना रोहित म्हणाला की, संघाचा ८० ते ९० टक्के हिस्सा मागील दोन वर्षांपासून एकत्र खेळत आहे. संघाचे सरासरी वय २५ वर्षे असून तरुण खेळाडूंकडे जिद्द आहे. विश्वचषक जिंकणे हेच एकमेव ध्येय असले पाहिजे, असेही त्याने नमूद केले.