RCB W vs UPW W Hat-trick Missed : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये सध्या रोमांचक क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. सोमवारी १२ जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यात एका विचित्र योगायोगाची चर्चा रंगली. यूपी वॉरियर्सने सलग ३ चेंडूंवर ३ विकेट्स गमावल्या, मात्र तांत्रिक कारणामुळे गोलंदाजाच्या नावावर ‘हॅट्ट्रिक’ची नोंद होऊ शकली नाही. ८ चेंडूंत ४ धक्के अन् यूपीचे कंबरडे मोडले – स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लॉरेन बेलने सुरुवातीलाच धक्का दिल्यानंतर खऱ्या अर्थाने नाट्य पाहायला मिळाले ते ८ व्या आणि ९ व्या षटकात. आरसीबीच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे यूपीच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. अवघ्या ८ चेंडूंच्या अंतरात यूपीने आपल्या ४ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. सलग ३ विकेट्स, पण ‘हॅट्ट्रिक’ का नाही? प्रेक्षकांना वाटले की मैदानावर स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रिक पाहायला मिळणार, पण तसे झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या ३ विकेट्स दोन वेगवेगळ्या षटकांत पडल्या: ८ व्या षटकाचा शेवट: श्रेयांका पाटीलने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फीबी लिचफिल्डला बाद केले. ९ व्या षटकाची सुरुवात: नडीन डीक्लर्क गोलंदाजीला आली. तिने पहिल्या चेंडूवर किरण नवगिरेला आणि दुसऱ्या चेंडूवर श्वेता सहरावतला बाद केले. हेही वाचा – Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज अशा प्रकारे यूपीने सलग ३ चेंडूंवर ३ विकेट्स गमावल्या, पण श्रेयांकाने एक आणि डीक्लर्कने दोन विकेट्स घेतल्यामुळे कोणाचीही वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. मेग लॅनिंगची सेना संकटात – तत्पूर्वी, ८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयांकाने यूपीची कर्णधार मेग लॅनिंगला बाद करून आपला दबदबा निर्माण केला होता. एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्यामुळे यूपी वॉरियर्सचा संघ मोठ्या धावसंख्येसाठी संघर्ष करताना दिसला. आरसीबीच्या कल्पक रणनीतीमुळे चाहत्यांना मैदानावर विकेट्सची पतझड पाहायला मिळाला. हेही वाचा – Mohammad Nabi : ‘माझा काय संबंध?’, मुस्तफिझूरबद्दल प्रश्न विचारताच मोहम्मद नबी बांगलादेशी पत्रकारावर संतापला यूपीने आरसीबीसमोर ठेवले १४४ धावांचे लक्ष्य – यूपीने आरसीबीसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यूपीने २० षटकांत पाच गडी बाद १४३ धावा केल्या. दीप्ती शर्माने ४५ आणि डिएंड्रा डॉटिनने नाबाद ४० धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटील आणि नॅडिन डी क्लार्कने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर लॉरेन बेलने एक विकेट घेतली.