Muktainagar : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल आज २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जात आहे. महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचे अनेक ठिकाणच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर येथील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षसाठी भावना महाजन उभ्या होत्या. तर शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील या त्यांच्या समोर रिंगणात होत्या. मात्र, चुरशीच्या झालेल्या लढतीत संजना पाटील यांनी विजय मिळवला असून, 2583 मतांनी त्या नगराध्यपदासाठी निवडणून आल्या आहेत. त्यांचा विजयाला जल्लोष कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी स्वतः आपली हाती कमान घेऊन उमेदवारासाठी मैदानात उतरल्या होत्या. पण मतदार राजाने संजना पाटील यांना पसंती दिली. या निवडणुकीत टीकाही टोकाची करण्यात आली होती. अनेक वादही झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजप पक्षाला मोठा पाठिंबा दिला असल्याने या ठिकाणी या दोन नेत्यांना एका अर्थाने खडसे परिवारासाठी हा पराभवाचा धक्का मानला जात आहे.