Rajasthan Royals shift home ground : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामाला मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी एक मोठी बातमी समोर येत असून, राजस्थान रॉयल्स (RR) संघ आपले ‘होम ग्राउंड’ बदलण्याच्या तयारीत आहे. राजस्थान रॉयल्सचे जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमसोबतचे नाते तुटण्याची शक्यता असून, पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम हे त्यांचे नवीन होम ग्राउंड असू शकते. पुणे का असेल राजस्थान रॉयल्सची पसंती? आयएएनएसच्या वृत्तानुसार, नोव्हेंबर महिन्यातच राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांसारख्या संघांनी पुण्याच्या गहुंजे येथील स्टेडियमला होम वेन्यू बनवण्याबाबत रस दाखवला होता. राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने नुकतीच पुण्याच्या स्टेडियमला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली आहे. आता राजस्थान रॉयल्स आणि एमसीए यांच्यातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. आरसीए (RCA) सोबतचा वाद ठरला कारणीभूत – २००८ पासून राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान जयपूर राहिले आहे. मात्र, राजस्थान क्रिकेट असोसिएशन (RCA) सोबत सुरू असलेला वाद हे मैदान बदलण्यामागचे मुख्य कारण मानले जात आहे. आयपीएल २०२५ दरम्यान आरसीएच्या एका अधिकाऱ्याने फ्रँचायझीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. फ्रँचायझीने हे आरोप फेटाळून लावत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. हेही वाचा – Jason Holder Bowling : बॉलिंग की थट्टा? जेसन होल्डरची ‘अजब’ गोलंदाजी! फलंदाज पाहतच राहिला अन् चेंडू….पाहा VIDEO सध्या आरसीएचा कारभार एका तदर्थ समितीद्वारे (Ad-hoc Committee) पाहिला जातोय, ज्यामध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. या अस्थिर वातावरणामुळे राजस्थान रॉयल्सने आपले सामने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पुण्याच्या स्टेडियमचा आयपीएल इतिहास – पुण्यातील एमसीए स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असून २०२३ च्या वनडे विश्वचषकातील सामनेही येथे झाले आहेत. यापूर्वी हे मैदान पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचे घरचे मैदान राहिले आहे. राजस्थान रॉयल्स गेल्या काही काळापासून गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवरही आपले काही सामने खेळत आली आहे. हेही वाचा – Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजाची धडाकेबाज निवृत्ती! वर्णभेदावर रोखठोक बोट; SCG वर अखेरचा सामना बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष – राजस्थान रॉयल्स आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यातील बोलणी सकारात्मक असून, बीसीसीआय (BCCI) लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. जर हे निश्चित झाले, तर पुण्याच्या क्रिकेट चाहत्यांना यंदा राजस्थान रॉयल्सच्या रूपात एक ‘होम टीम’ मिळणार आहे.