मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेने मुंबईतील राजकीय वातावरण तापले. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईकरांना संबोधित केल्याने हा क्षण ऐतिहासिक ठरला. आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भाषणानंतर राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. एमआयएमसोबतची युती, निवडणुकांमध्ये पैशांचा अमर्याद वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट देणं आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला नगरसेवक केल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत त्यांनी नैतिकतेचा सवाल उपस्थित केला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत सभास्थळी एलईडी स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओद्वारे त्यांनी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीचा लेखाजोखा मांडला. देशाच्या आर्थिक धोरणांमुळे काही मोजक्या उद्योगपतींचं साम्राज्य वाढत असताना सामान्य माणूस आणि मराठी माणूस कुठे उभा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई मराठी माणसासाठी किती महत्त्वाची आहे, यावर भाष्य करत राज ठाकरे यांनी मुंबईवरील हक्क, विकास आणि राजकीय निर्णयांमध्ये स्थानिकांचा सहभाग का गरजेचा आहे, याकडेही लक्ष वेधले. ठाकरे बंधूंच्या या पहिल्याच संयुक्त सभेमुळे महापालिका निवडणुकीच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.