BMC Results 2026 : मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. मुंबईत तब्बल २० वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने या युतीकडे विशेष लक्ष होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह या आघाडीने २२७ जागांवर लढत दिली. मात्र, भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत सत्ता काबीज केली. या युतीत मनसेने ५३ जागा लढवल्या, त्यापैकी केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला. निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पराभवाचे दुःख व्यक्त केले. मात्र, आपण खचून जाणाऱ्यांतले नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या लढ्याचे कौतुक केले. अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या बळाविरुद्ध शिवशक्तीची लढाई होती, असे सांगत त्यांनी निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा विश्वास व्यक्त केला. मराठी माणूस, मराठी भाषा आणि अस्मितेसाठीची लढाई ही दीर्घकालीन असल्याचे नमूद करत राज ठाकरे यांनी काय चुकले, काय कमी पडले याचे आत्मपरीक्षण करून नव्याने संघटना उभारण्याचे आवाहन केले. निवडणुका येतील-जातील, पण आपला श्वास मराठी आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.