नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी घोषणाबाजी कॉंग्रेसच्या रॅलीत झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावरून आक्रमक पवित्रा स्वीकारत भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत माफी मागावी, अशी मागणी केली. कथित धमकीच्या घडामोडीचे पडसाद उमटून संसदेही गदारोळ झाला. कॉंग्रेसची रविवारी दिल्लीत व्होट चोर, गद्दी छोड रॅली झाली. त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींविषयी धमकीची भाषा वापरत घोषणाबाजी केल्याचा आरोप भाजपने केला. कथित घोषणाबाजीवरून कॉंग्रेसला घेरण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते किरेन रिजीजू यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेतली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जाहीरपणे पंतप्रधानांना धमकावण्याचे कृत्य अतिशय दुर्दैवी आणि व्यथित करणारे आहे. त्यासाठी राहुल आणि खर्गेंनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत माफी मागायला हवी. भाजप आणि कॉंग्रेसचे नेते-कार्यकर्ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत; शत्रू नाहीत. राजकीय मतभेद ही वेगळी बाब आहे. त्यातून एकमेकांवर टीकाही केली जाते. पण, एकमेकांना जीवे मारण्याचा विचार कधीच करत नाही. तशी भाषाही वापरत नाही. त्यामुळेच तशा भाषेचा वापर ही कुठली मानसिकता आहे, असा सवाल त्यांनी केला. मोदी हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान आहेत. केवळ देशच नव्हे; तर संपूर्ण जग त्यांचा आदर करते. त्यामुळे विरोधकांच्या गोटातील काही जणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे योग्य नाही. केवळ निषेध करून त्या कृत्याचा विषय संपणार नाही. त्यासाठी माफीच मागायला हवी, अशी आग्रही भूमिका रिजीजू यांनी मांडली.