पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मंगळवार पेठ परिसरातील भेटीदरम्यान त्यांनी प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपा- रिपब्लिकन युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला. महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे आठवले यांनी प्रचारफेरीदरम्यान सांगितले. प्रचाराला रंगत येत असताना शनिवारी रात्री भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके आणि कल्पना बहिरट यांच्या प्रचारासाठी मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरात उघड्या जीपमधून प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचारादरम्यान मिश्किल शैलीत शीघ्रकाव्य सादर करत आठवले म्हणाले, आम्हाला करायची आहे दुश्मनांची माती, म्हणूनच पुण्यात सत्तेवर येणार आहे महायुती. ते म्हणाले, की आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. महायुती ही आपलीच असून, प्रकाश आंबेडकर आणि मायावती हेही आपलेच आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेला जनादेश हा जनतेच्या विश्वासाचे ठोस प्रतीक असून, पुणे महापालिका निवडणुकीत लाखोंची भीमशक्ती भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.