पुणे – महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या सर्वच जोमाने सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. याच प्रचारात प्रभाग क्रमांक २७ मध्ये शाळेतील जुने मित्र भेटण्याचा योगायोग जुळून आला. येथील भाजपचे उमेदवार महेश (ऊर्फ) अमर आवळे यांना नवी पेठमध्ये प्रचार करीत असताना शाळेतील जुने मित्र भेटले आणि आपला मित्रच प्रचारासाठी घरात आलेला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आवळे यांनी मंगळवारी सकाळी नवी पेठ येथे स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी त्यांच्या शाळेतील मित्र विलास नावडकर, विशाल ढुमके हे दोघे त्यांना भेटले. हे सर्वजण नूतन बालविकास मंदिर शाळेत एकत्र होते. आपला मित्र महापालिकेची निवडणूक लढवतो आहे आणि तो प्रचारासाठी आपल्याच घरात आलेला पाहून या मित्रांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या भेटीत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच, त्यासोबतच हे मित्रही लगेचच आवळेंसोबत प्रचारात सहभागीही झाले. मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मीनगर भागातील चारही लेनमधून भाजपच्या सर्व उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली. सह्याद्री मैदानापासून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप गजानन महाराज मठ चौकात झाली. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती.