पुणे – जांभूळवाडी नवीन बोगदा परिसरात वाहनचालकांसाठी “रस्ता सुरक्षा मार्गदर्शन आणि वाहनचालकांचे आरोग्य तपासणी शिबिर” पार पडले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शना नुसार व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व, वाहन चालविताना होणाऱ्या मानवी चुका व त्यातून घडणाऱ्या अपघातांवर सविस्तर मार्गदर्शन केले. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेग नियंत्रण, मोबाईल वापरावर निर्बंध, वाहनांची नियमित तपासणी व थकव्यामुळे होणाऱ्या अपघातांविषयी त्यांनी वाहनचालकांना जागरूक केले. डोळे तपासणी शिबिराला वाहतूकदारांचा प्रतिसाद : वाहन चालविताना दृष्टीचे महत्त्व अधोरेखित करत तज्ज्ञ डॉक्टर्सनी चालकांचे दूरची व जवळची दृष्टी, रंगदृष्टी, नाईट व्हिजन, रक्तदाब व मधुमेह तपासणी केली. एच. व्ही. देसाई नेत्रालय यांच्या पथकाने या उपक्रमात मोलाची सेवा बजावली. एकूण १०२ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा व शासनाच्या सहाय्य योजनेविषयी मार्गदर्शन : कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर यांनी सर्वांचे आभार मानत रस्ता सुरक्षा जनजागृतीची गरज अधोरेखित केली. तसेच शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या “रहावीर” अपघात मदत योजनेची माहितीही यावेळी देण्यात आली. अतुल दराडे व अर्जुन खिंडरे यांनी उपस्थित वाहनचालकांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घ्यायला लावली. यावेळी सहायक मोटार निरीक्षक प्राजक्त गोडगे, अनुजा काळमेघ, डॉ. मयूर फंदे, अभिजित पानसरे तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.