पुणे – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आणि नाबार्ड व्यवस्थापनाकडून झालेल्या अनावश्यक विलंबाविरुद्ध ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नाबार्डच्या कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात आले. संघटनेतर्फे यापूर्वी पुण्यात १९ डिसेंबरला धरणे आंदोलन करीत त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. संघटनेच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने २१ जुलै २०२३ रोजीच्या आदेशात नाबार्डमध्ये भरती झालेल्या पेन्शनधारकांना पेन्शन सुधारणांपासून अन्यायकारकपणे दूर ठेवले आहे. त्यामुळे नाबार्डच्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट तयार झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मागण्यांवर वेळेत कारवाई न झाल्यास यापुढे संसदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी असोसिएशनने दिला आहे. यामध्ये २० वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा फायदा देणे, शेवटच्या वेतनावर किंवा १० महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीच्या आधारावर अधिक फायदेशीर ठरणाऱ्या रकमेवर निवृत्तीवेतन देणे, अशा अनेक मागण्या संघटनेने केल्या आहेत.