पुणे – महापालिका निवडणूक मतदानाच्या रणसंग्रामासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते पोलीस अंमलदार असा तब्बल १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. संवेदनशील मतदार केंद्रासह महत्त्वाच्या केंद्रावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस अंमलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त आणि उपायुक्त अशा पद्धतीने बुथ केंद्रावरील चारस्तरीय सुरक्षितता तैनात केली जाणार आहे. वादविवादासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी पथक दक्ष आहेत. पुण्यात तब्बल ३ हजार ९८३ बुथ केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक कर्मचारी तैनात केला जाणार आहे. ९१३ इमारतीत संपूर्ण मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याठिकाणी दोन अंमलदार नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जाणार आहे. मतदान प्रकियावेळी कायदा सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेवरही आहे. त्याअनुषंगाने जबाबदारी वाटून घेण्यासाठी ४५४ झोन केले आहेत. त्याठिकाणी हद्दीतील ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शानाखाली पेट्रोलिंग केले जाणार आहे. त्याचा आढावा वरिष्ठ अधिकार्यांना दिला जाणार आहे. दरम्यान, शहरात ९० संवेदनशील मतदान ठिकाणे असून, त्यादृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. त्याठिकाणी १ अधिकारी आणि ५ कर्मचारी नियुक्त केले जाणा आहेत, तर ८ क्यूआरटी टीम दक्ष ठेवण्यात आल्या आहेत, तसेच ६ अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबत प्रत्येकी ५० पोलीस अंमलदारांचे स्ट्रायकिंग असणार आहे. मतदानासाठी बंदोबस्त ! पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त- ४, पोलीस उपायुक्त- १४, पोलीस अंमलदार व अधिकारी- ७ हजार, होमगार्ड- ३ हजार, एसआरपीफफ- ४ कंपन्या, बाहेरून मागविलेले अधिकारी कर्मचारी- १ हजार ५००, दुचाकीद्वारे पेट्रोलिंग- ५०० कर्मचारी, क्यूआरटी-८ टीम तैनात आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त संजय पाटील, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनचे पोलीस उपायुक्तांच्या देखरेखीतून मतदान शांततेत पार पाडले जाणार आहे.