पुणे – शहराचा दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या शिंदे आळी, चिंचेची तालीम परिसरात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या सुविधांच्या उभारणीसाठी लोकसहभाग आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५ ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांना दिली. टिळक यांनी मंगळवारी शिंदे आळी, चिंचेची तालीम, राजा दिनकर केळकर संग्रहालय परिसरात घरोघरी भेट देत मतदारांशी संवाद साधला. या वेळी काढलेल्या पदयात्रेदरम्यान टिळक यांनी स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. अरुंद रस्ते, वाहतूक अडचणी, स्वच्छतेचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी प्रामुख्याने या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, तसेच त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन टिळक यांना केले. या वेळी स्वत: कुणाल यांनी नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत प्रशासनाशी समन्वय साधून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. प्रभागाचा संतुलित विकास साधण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने मतदारांनी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे स्थानिक पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.