पुणे : पुढचे आठ-दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा. मात्र, जे काही करताय ते नियमामध्ये करा! कोठेही सिसीटीव्ही फुटेजमध्ये येणार नाही, कोणतेही चुकीचे व्हिडीओ व्हायरल होणार नाहीत, याकडे कळजीपूर्वक लक्ष द्या, असा मोलाचा खबरदारीचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांना दिला. उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सर्व उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित उमेदवारांशी संवाद साधत प्रत्येकाची भेट घेतली. यावेळी भाजपचा सामना करण्यासाठी पवार यांनी उमेदवारांना कानमंत्रही दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेली पुणे महापालिका हिसकावून घेण्यासाठी अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. सलग दोन दिवस वेगवेगळया पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर, तसेच प्रभागनिहाय समिकरणे जाणून घेतल्यानंतर पवार यांनी आपल्या उमेदवारांशी संवाद साधला. गेल्या काही वर्षांत आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, आपला प्रचार घरोघरी जाऊन करा, जनतेशी संपर्क ठेवा, अशा सूचनाही दिल्या. यावेळी पवार यांनी आपण केलेली कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा. तुम्ही येणाऱ्या वर्षांत प्रभागात कोणती कामे करणार आहेत, हे जनतेला समजावून सांगा. भाजपच्या सत्ताकाळात कोणती कामे झाली नाहीत, हे देखील जनतेला सांगा. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणे का गरजेचे आहे, हे लोकांच्या मनावर ठसवा. तसेच पुढचे आठ-दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याने प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना अजित पवार यांनी उमेदवारांना दिल्या. तसेच अजित पवार यांच्याविरोधात भाजपचा आक्रमक प्रचार सुरू झाल्यावर राष्ट्रवादीचीही जशास तशी उत्तर देण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती उपस्थित नगरसेवकांनी दिली.