पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना कलेसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणांच्या प्रस्तावांसाठी यंदा ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त गुण दिले जातात. शासन निर्णयानुसार, हे प्रस्ताव विभागीय मंडळांकडे सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी असते. मात्र, यंदा शासकीय रेखाकला परीक्षेचा (एलिमेंटरी व इंटरमिडीएट) निकाल जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदत वाढविली आहे. राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे सर्व विभागीय मंडळांना याच्या सूचना दिल्या आहेत. माध्यमिक शाळांना आता ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे कलागुणांचे प्रस्ताव सादर करता येतील. या निर्णयामुळे चित्रकला परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणताही पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही शिक्षण मंडळाने दिले असून सर्व शाळांना याची माहिती देण्यास सांगण्यत आले आहे.