पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी वेगळे लढत असलो, तरी महायुतीतील पक्ष एकमेकांवर टीका करणार नाहीत, असे ठरले आहे. आतापर्यंत तरी आम्ही ते पाळले आहे अजित पवारही ते पाळतील, अशी अपेक्षा आहे, असे सूचक विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजन आणि प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवून पवार हे आमच्यासोबत आले आहेत. भाजपचे नेतृत्व २०२७ चे पुणे डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेमधील सत्ताकाळात २०१७ ते २०२२ दरम्यान भाजपने काय कामे केली, याची यादी अजित पवार यांना पाठवून देण्यात येईल, असेही बावनकुळे म्हणाले. या वेळी पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, राजेश पांडे आदी उपस्थित होते. भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर पुणेकर भाजपचाच महापौर बसवतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळासमोर राज्याचा २०४७ चा विकास आराखडा समोर ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. विकसित पुण्याचा संकल्प केल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. पुणे हे केंद्रस्थानी आणून मेट्रोचे जाळे असेल, पर्यावरण पूरक रस्ते, सर्वच भागात चोवीस तास पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टेक्नॉलॉजी, नदी सुधार प्रकल्प, पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. लोहगाव विमानतळावरील सुविधा वाढविण्याचा विचार झाला आहे. रोजगार, क्रीडा संकुल, झोपडपट्टी पुनर्वसन,रुग्णालय दुरुस्ती, स्मार्ट शाळा अशा विविध अंगाने कामे सुरू केली आहेत. गुंठेवारीचे नियम सुलभ करत आहोत. तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्याने पाच लाख कुटुंबांना फायदा झाला आहे. प्रत्येक घराचे मॅपिंग. घरांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला प्रचंड मतदान केले. त्याच पद्धतीने विकसित पुणे करण्यासाठी ५१ टक्क्यांपेक्षा अधिक जागा भाजप जिंकेल, असे बावनकुळे म्हणाले. त्या प्रकरणाची चौकशी करू पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने शासनाच्या भूखंडाचा गैरपद्धतीने व्यवहार केला आहे. याप्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डेक्कन शुगर या धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत संस्थेला दिलेल्या जागेवर बांधकाम करून त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय थाटताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.