राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेचे लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष म्हणून मंगेश वसंतराव गुंडाळ यांनी आज (दि. 12) मोठ्या उत्साहात पदभार स्वीकारला. याचवेळी झालेल्या विशेष सभेत मनोहर सांडभोर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या नगरपरिषद निवडणुकीत मोठे यश मिळवले असून, पदग्रहण सोहळ्यास सर्वपक्षीय नगरसेवक, नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, तर 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत मंगेश गुंडाळ यांची नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली. नगरपरिषदेत एकूण 10 नगरसेवक निवडून आले असून (त्यापैकी 1 बिनविरोध), राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, भाजपचे 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या निकालात शिंदे गटाच्या शिवसेनेने नगराध्यक्षपदावर आपला ठसा उमटवला आहे. सोमवारी (दि. 12) नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी पदाधिकार्यांचे स्वागत केले. नगरपरिषद कार्यालय रांगोळी, फुलांच्या माळा व पायघड्यांनी सजवण्यात आले होते. सकाळी नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी पदभार स्वीकारला, तर दुपारी साडेबारा वाजता झालेल्या विशेष सभेत मनोहर सांडभोर यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. शिंदे गटाकडून सचिन मधवे, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सागर सातकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या समर्थकांनी गुलाल उधळत व डीजेच्या तालावर मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, सचिन लांडगे, नगरसेवक वैभव घुमटकर, निलेश घुमटकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वीच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात करण्यात आली असून, पुढील काळात विकासकामांना गती दिली जाईल, असे अतुल देशमुख यांनी सांगितले. भगवान पोखरकर यांनी राजगुरुनगर व चाकण नगरपरिषदेत शिवसेनेची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पक्ष स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. या निकालामुळे पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, राजगुरुनगरच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 26 जानेवारी 2026 पासून राजगुरुनगर शहरात दररोज स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला जाईल. वाडा रस्ता व न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन पार्किंग व्यवस्था लागू केली जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कचरा प्रकल्प व एसटीपी प्लांटसाठी आवश्यक जागा व निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. -मंगेश गुंडाळ, नगराध्यक्ष