जांबुत : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या गंभीर बनलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ५७. ५० लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हा संपूर्ण निधी पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या निधीतून गावठाण शाळा, अंगणवाड्या आणि वस्तीशाळांभोवती संरक्षक भिंती बांधणे तसेच संरक्षण भिंतींवर काटेरी तार (तारेचे जाळी) लावणे अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यूच्या घटनांमुळे लहान शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांच्या आवारात किंवा आसपास बिबट्याचा वावर असल्याने पालक आणि शिक्षक चिंतेत होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरपंच राजेंद्र दाभाडे आणि ग्रामस्थांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संरक्षक भिंतींसाठी निधीची मागणी केली होती. प्रसंगी दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत, त्यांच्या आमदार निधीतून शालेय मुलांच्या संरक्षणासाठी तातडीने निधी मंजूर केला आहे. पिंपरखेड येथील गावठाण शाळा संरक्षक भिंत बांधणे – २१ लक्ष, गावठाण प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे – ७ लक्ष, दत्तवाडी अंगणवाडी संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष, ढोमेमळा शाळा संरक्षक भिंत बांधणे ८ लक्ष, कोयमहाल वस्ती पारगाव रोड शाळा संरक्षक भिंत बांधणे ६ लक्ष, दाभाडेमळा संरक्षक भिंतीवर काटेरी तार लावणे ४ लक्ष, बोऱ्हाडेवस्ती अंगणवाडी संरक्षक भिंतीवर काटेरी तार लावणे १.५० लक्ष असा एकूण ५७.५० लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राजेंद्र गावडे यांनी दिली. या निधीमुळे येत्या काळात ही कामे तातडीने पूर्ण होऊन पिंपरखेडमधील शाळा परिसर खऱ्या अर्थाने सुरक्षित होतील, संरक्षक भिंती आणि तारेचे जाळी यामुळे बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी शाळेच्या आवारात प्रवेश करू शकणार नाहीत. मुलांचे शिक्षण सुरक्षित होईल असे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.