Priyanka Gandhi । Indira Gandhi : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या दिग्गज नेत्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर पंतप्रधान ठरू शकतील, अशी भावना पक्षाच्या एका खासदाराने व्यक्त केली. त्यावरून कॉंग्रेसमधून प्रियंका यांचे प्रोजेक्शन सुरू झाल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. अशात प्रियंका यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकीत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बांगलादेशात काही दिवसांपासून पुन्हा अशांत स्थिती निर्माण झाली आहे. त्या देशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर कॉंग्रेसचे उत्तरप्रदेशातील खासदार इम्रान मसुद यांनी प्रतिक्रिया दिली. बांगलादेशमधील स्थितीसंदर्भात भारताने पाऊल उचलण्याच्या दृष्टीने प्रियंका चांगल्या पंतप्रधान ठरतील. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे ठोस कृती केली; तशी प्रियंका करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या खासदाराने प्रियंका यांचे नाव पुढे केल्याने राजकीय चर्चांना खतपाणी मिळाले. त्यावर वढेरा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. प्रियंका त्यांच्या आजीकडून (इंदिरा गांधी) खूप काही शिकल्या आहेत. वडील, आई आणि भावाकडूनही त्यांना चांगले धडे मिळाले आहेत. लोक प्रियंकांची प्रशंसा करतात. त्या जनहिताच्या मुद्द्यांवर बोलत असल्याचे जनता पाहत आहे, असे ते म्हणाले. भाजपने साधली संधी मसुद आणि वढेरा यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याची संधी साधली. भाजपच्या वतीने प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी प्रतिक्रिया दिली. मसुद यांच्या वक्तव्यातून त्यांचा राहुल यांच्यावर विश्वास नसल्याचे सूचित होते. राहुल यांच्या जागी प्रियंका यांना आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यावर वढेरा यांनीही शिक्कामोर्तब केले, असे पुनावाला यांनी म्हटले.