भंडारा : प्रफुल पटेल हा बदमाश माणूस आहे. ते फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात. मी त्यांच्या गोंदियात जावून आलो आहे. त्यांच्या गोंदियापेक्षा आपली साकोली कधी पण बरी. गोंदियात रस्तेसुद्धा धड नाहीत. तिथे मोठे मच्छर आहेत, ते इकडे येवून मला मतदान दिले नाही तर… अशी लोकांना धमकी देतात, अशी जहरी टीका कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल पटेल यांच्यावर केली. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद जगजाहीर आहे. प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांबाबत पराकोटीचे वादग्रस्त विधान करीत असतात. कधी मुख्यमंत्री पदावरून तर कधी एकमेकांच्या कुंडल्या काढण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच असते. पटोलेंच्या नव्या वक्तव्यामुळे मात्र, भंडारा – गोंदिया या लोकसभा क्षेत्रातील दोन दिग्गज नेत्यांमधील शाब्दिक युद्ध पुन्हा सुरू झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच, निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मते जिथे टाकायची तिथेच टाकतात, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी भंडाऱ्यात केले होते. तसेच समझनेवाले को इशारा काफी है असाही उपरोधक टोला देखील नाना पटोलेंना लगावला होता. पटेलांच्या टीकेनंतर नाना पटोलेंनी देखील जोरदार पलटवार केला होता. पटेलांनी आजपर्यंत केवळ पैशांच्या जोरावर राजकारण केले आणि निवडणूका जिंकल्या. भविष्यात देखील ते याच गोष्टी करणार, असे पटोलेंनी सुनावले होते. बावनकुळेंवरही टीका प्रफुल पटेल यांना धारेवर धरल्यानंतर यांनी त्यांचा मोर्चा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वळवला आणि म्हणाले की, बावनकुळे इकडे येतात आणि सांगतात मी तुमच्या पट्ट्यावर सही करणार नाही. का सही करणार नाही ? त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, पण त्यांचा माज कमी झालेला नाही, कारण ते बेईमानी करून निवडून आले आहेत, असे पटोले म्हणाले. त्यांच्या दोन्ही वक्तव्यांमुळे नक्कीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.