Nashik – नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून नाशिकसह राज्यभरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये ‘साधुग्राम’ उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत असून नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. २९ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनीही या वृक्षतोडीला विरोध करून भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी हजारो झाडे तोडण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नाशिककरांनी जनसुनावणीमध्ये प्रचंड विरोध केला. तरीही नाशिक महापालिका आणि सरकार तसेच सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हटायला तयार नाहीत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात आंदोलन सुरू केले आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार ट्वीट करत साधूंच्या आडून उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे सरकारला सुनावले आहे. त्याचवेळी याविरोधात नाशिककरांनी यावे, असे आवाहन करत मनसे तुमच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात २९ नोव्हेंबर रोजी या समाज माध्यमावर पोस्ट टाकत, साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन टाकण्याचा संधिसाधूपणा सरकारने करू नये, असे सरकारला सुनावले आहे. मुळात तपोवनातील वृक्ष का तोडले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. यापूर्वी मनसेच्या हातात नाशिक महापालिका असताना नियोजन इतके उत्कृष्ट होते की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडे तोडावी लागली नाहीत. मग आता कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडावी लागत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.