पुणे – प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सूचना आणि समस्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार त्या सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांनी जनसंवाद यात्रेत दिले. शेट्टी यांच्या प्रचारार्थ झांबरे चावडी, देवजी बाबा मठ, त्रिशुंड्या गणपती, विठ्ठल मंदिर, नागेश्वर मंदिर, अरुण डेअरी, तसेच जैन मंदिर परिसरात ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी पॅनेल प्रमुख सदानंद शेट्टी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. श. म. तोडकर ऊर्फ अण्णा ह्यांचे आशीर्वाद घेऊन प्रचारफेरीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी शेट्टी यांनी प्रभागातील विविध चौक, मंदिरे, बाजारपेठा, वसाहती आणि रहिवासी भागांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा शांतपणे ऐकून घेतल्या व नोंद केली त्यानुसार, या समस्या प्राधान्यक्रमांने सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण व युवकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे आश्वासन या वेळी मतदारांना दिले. या जनसंवाद यात्रेला या भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सुजाता शेट्टी यांना प्रभागात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.