पुणे – मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेला असलेला ऐतिहासिक वारसा जपत प्रभागातील समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असून, या भागातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५-ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांशी बोलताना दिली. टिळक यांनी गुरुवारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी घरोघरी संपर्क अभियानाअंतर्गत सदाशिव पेठ परिसरात भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या दौर्यातून परिसरातील नागरी अडचणी जाणून घेण्यावर भर दिला. या वेळी सदाशिव पेठेत संवाद साधताना नागरिकांनी वाढती वाहतूक कोंडी, वाहनांसाठी अपुरी पार्किंग व्यवस्था, जुन्या वाडे-वस्त्यांची देखभाल, तसेच अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या. या समस्या परिसराच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्याचे नागरिकांनी नमूद केले. कुणाल टिळक यांनी नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत वारसा जपून विकास साधण्याची आवश्यकता व्यक्त केली. नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगची योग्य व्यवस्था आणि स्थानिक गरजांनुसार उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपर्क अभियानादरम्यान नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी थेट संवादावर दिला जाणारा भर आणि क्षेत्रविशिष्ट दृष्टिकोनामुळे प्रभागाच्या विकासाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.