पुणे – कमला नेहरू रुग्णालयाशी असलेल्या ऋणानुबंधांमुळे या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच पडतील,’ अशी भावना प्रभाग २४ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांनी व्यक्त केली. या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी १३ कोटी रुपयांच्या कामाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. प्रभागातील नागरिकांसह शहरातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठीचा हे रुग्णालय मैलाचा दगड असल्याचे ते म्हणाले. याबाबत बिडकर म्हणाले, की माझ्या आईने याच रुग्णालयात १८ वर्षे परिचारिकेचे काम केले. आई नंदिनी यांच्यासोबत हात धरून लहानपणी मी या रुग्णालयात फिरलो आहे. त्यामुळे या वास्तूविषयी माझ्या मनात विशेष आत्मीयता आहे. वडील माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष कै. मधुकर बिडकर यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाची अनेक विकासकामे मार्गी लागली. पुढे माझ्या नगरसेवकपदाच्या आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळात रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. रुग्णालयात सीटी स्कॅन, अँजिओग्राफी, कॅथलॅब आदी सुविधा कमला नेहरू रुग्णालयात आहेत. कै. मधुकर बिडकर यांच्या स्मरणार्थ २४ तास रक्तपेढीही सुरू आहे. नव्या कामांतर्गत कमला नेहरू रुग्णालयात पाच अद्ययावत ऑपरेशन थिएटर्सची उभारणी सुरू आहे. रुग्णालयाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण, रुग्णांसाठी प्रतीक्षालय, उपाहारगृह, ऑन-ग्रीड सोलर यंत्रणेची उभारणी अशी कामेही केली जाणार असल्याने त्यांनी सांगितले.