पुणे : पुणे महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत १६५ पैकी तब्बल १२० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या या एकहाती वर्चस्वाबरोबरच पुण्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. विशेषतः अजित पवार गटाला येथे सपशेल अपयश आले असून, अनेक दिग्गज नेत्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत सहा प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष थेट रिंगणात उतरले होते. मात्र, या ‘हाय-प्रोफाईल’ लढतींमध्ये मतदारांनी अनपेक्षित कौल देत चक्क चार बड्या पक्षांच्या शहराध्यक्षांना पराभूत केले आहे. भाजप आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष वगळता इतर सर्वांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. दोघांचा विजय, चौघांना दणका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या प्रभागातून विजय मिळवत पक्षाचा गड कायम राखला. त्याचबरोबर काँग्रेसचे अनुभवी नेते व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही विजय मिळवून पुण्यात काँग्रेसची उपस्थिती टिकवून ठेवली. मात्र, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, मनसेचे आक्रमक शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना मतदारांनी दारुण पराभवाचा धक्का दिला. पुणे महापालिकेचा निकाल पुणे महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून १६५ पैकी १२० जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अजित पवार गटाला २९ जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, तर मनसे आणि शिंदे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही.