Bomb threat – पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या दिल्लीहून उड्डाण केलेल्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर रविवारी सकाळी लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगो कंपनीचे फ्लाइट 6ई-6650 मध्ये 222 प्रवासी, त्यात आठ बालकांचा समावेश होता, तसेच दोन वैमानिक आणि पाच क्रू सदस्य होते. सकाळी 8.46 वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलला बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि 9.17 वाजता ते लखनौमध्ये सुरक्षित उतरवण्यात आले. लँडिंगनंतर विमान आयसोलेशन बेमध्ये उभे करण्यात आले. प्राथमिक तपासात एका टिश्यू पेपरवर ‘प्लेन में बॉम्ब’ अशी हाताने लिहिलेली चिठ्ठी आढळली. सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असून पुढील तपास सुरू आहे.