इंदापूर : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात झालेली अनपेक्षित युती ही केवळ शहरी राजकारणापुरती मर्यादित नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, या युतीचे पडसाद ग्रामीण राजकारणात उमटणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुका हा नेहमीच तीव्र राजकीय संघर्षाचा साक्षीदार राहिला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय मतभेद आणि सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहेत. दोन्ही नेते वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे असले, तरी वरिष्ठ पातळीवरून युतीचे स्पष्ट संकेत मिळाल्यास, तालुक्यात आजवर न पाहिलेले राजकीय चित्र उभे राहू शकते. या संघर्षाची झलक नुकत्याच झालेल्या इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत दिसून आली. कृषिमंत्री भरणे यांना रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीचा प्रयोग केला. तालुक्यातील विविध विरोधी शक्तींना एकत्र आणून जोरदार लढत दिली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आले तरीही सत्ता परिवर्तन हमखास होत नाही, हा संदेश या निकालातून स्पष्ट झाला. दरम्यान, कृष्णा-भीमा विकास आघाडीतील ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी तालुक्यातील राजकारण अधिक तापले आहे. भाजपमध्ये आधीच सक्रिय असलेले प्रवीण माने यांच्यासह गारटकर यांचा प्रवेश झाल्यास भाजपची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपही येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत अधिक आक्रमक भूमिका घेईल, हे स्पष्ट आहे. या सगळ्या राजकीय हालचालींच्या केंद्रस्थानी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका ठरत आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ते स्वतंत्र रणनिती आखणार की वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार युतीचा भाग बनणार, याबाबत तालुक्यात मोठे औत्सुक्य आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्या, तरी अद्याप त्याबाबत कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. जर पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेला राजकीय प्रयोग इंदापूर तालुक्यात प्रत्यक्षात उतरू शकतो. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसल्यास, ते केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक समीकरणांनाही मोठा धक्का देणारे ठरेल. सध्या इंदापूर तालुक्याची जनता एका प्रश्नाकडे डोळे लावून पाहत आहे. ही युती खरोखरच तळागाळातील विकासासाठी होणार की केवळ राजकीय सोयीसाठीचा तडजोडीचा प्रयोग ठरणार? हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.